जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास ३० नोव्हेंबर अंतिम मुदत
मुदतीत नंबर प्लेट बसविण्याचे श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन
शिर्डी, – वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटपणा रोखणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची स्पष्ट ओळख पटविण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांसाठी एचएसआरपी बसविण्याची अधिकृत सेवा एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (M/s FTA HSRP Solutions Pvt. Ltd.) या अधिकृत सेवा पुरवठादाराकडे सोपविण्यात आली आहे. संबंधित कंपनीच्या maharashtrahsrp.com या संकेतस्थळावर गाडी क्रमांकाद्वारे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.
श्रीरामपूर कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर व अकोले या तालुक्यांमध्ये अधिकृत फिटिंग केंद्रे नियुक्त करण्यात आली असून त्यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एचएसआरपी बसविण्यासाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क पुढीलप्रमाणे आहे — दुचाकी व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीन चाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी वाहने, ट्रक, ट्रेलर्स व इतर मोठ्या वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून).
निर्धारित कालावधीनंतर एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. जोशी यांनी दिली. त्यामुळे विहित कालावधीत नंबर प्लेट बसवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


