दंडक्रम पारायण ५० दिवसांत केलं पूर्ण; अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ वर्षीय वेदमुर्ती देवव्रत रेखेचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ वर्षीय वेदमुर्ती देवव्रत रेखे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरभरून कौतुक केलं आहे. वेदमुर्ती देवव्रत रेखे यांनी काशीमध्ये मागील काही दिवसांत एक आध्यात्मिक साधना पूर्ण केली आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील २००० मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण देवव्रत रेखे यांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे सध्या त्यांची मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत देवव्रत रेखे यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत महेश रेखे यांचं कौतुक करताना म्हटलं की, “१९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केलं ते येणाऱ्या पिढ्या नक्की लक्षात ठेवतील. भारतीय संस्कृतीबाबत आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी ५० दिवसांत शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील २००० मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केलं आहे. यामध्ये अनेक वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचा समावेश असतो, ते आपल्या गुरु परंपराच्या सर्वोत्तमतेचं मूर्त रूप आहेत. काशीचा खासदार म्हणून मला आनंद आहे की या पवित्र शहरात हे घडलं. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संतांना, विद्वानांना आणि भारतातील विविध संघटनांना माझा प्रणाम”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे “महाराष्ट्रातील १९ वर्षीय तरुण देवव्रत महेश रेखे यांनी त्यांच्या अद्भुत स्मरणशक्तीच्या माध्यमातून २००० वैदिक मंत्रांचं स्मरण करून मिळवलेलं अभूतपूर्व यश संपूर्ण आध्यात्मिक जगासाठी एक प्रेरणा आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील दंडक्रम पारायण ५० दिवस अखंड, शुद्ध आणि पूर्ण शिस्तीने पूर्ण करणं म्हणजे आपल्या प्राचीन गुरु परंपरेच्या वैभवाचं पुनरुज्जीवन आहे. पवित्र काशीच्या दिव्य भूमीवर हा वैदिक विधी पार पडला ही माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं कुटुंब, शिक्षक, संत आणि ज्यांच्या पाठिंब्याने ही तपस्या यशस्वी झाली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो”, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

“वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे (वय १९) यांची एक अनोखी कामगिरी. अहिल्यानगर येथील वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे यांचा मुलगा, वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील जवळजवळ २००० मंत्रांचं पठण (दंडक्रम पारायणम्) पूर्ण केलं. हे पारायणम् ५० दिवस अविरत चाललं. देवव्रत रेखे यांना शुभेच्छा आणि त्यांच्या कुटुंबाला माझा नमस्कार”, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी आशीर्वादित केलेल्या ऐतिहासिक दंडक्रम पारायणासाठी १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचा काशी येथे सन्मान करण्यात आला आहे. काशीमध्ये आध्यात्मिक सोहळ्यात देवव्रत रेखे यांचा श्री शृंगेरी शारदा पीठाच्या जगद्गुरू शंकराचार्यांकडून सोन्याचं ब्रेसलेट (५ लाख किमतीचं) आणि १,११,११६ रुपये देऊन सन्मान करण्यात आला आहे”, अशी माहिती शृंगेरी मठाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles