Friday, February 20, 2026

शनिशिंगणापूर अ‍ॅप घोटाळा; पोलिसांकडून अ‍ॅप मालकांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन सेवांसाठी करण्यात आलेल्या करारातील अनियमितता उघडकीस येत असून या प्रकरणातील अ‍ॅप मालक तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. येथील सायबर पोलिसांनी देवस्थानशी करार असलेल्या चार अ‍ॅप मालकांना नोटीसा पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते, मात्र काहीजण अनुपस्थित राहिल्याने पुन्हा नोटीसा देण्यात आल्या आहेत.

राज्यातील विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात शनैश्वर देवस्थानच्या अ‍ॅप करारातील संदिग्ध व्यवहारांचा मुद्दा उपस्थित होताच पोलिसांनी तत्काळ स्वतः फिर्यादी होत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास येथील सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून आता पुन्हा अधिवेशन सुरू झाल्याने तपासाला गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. देवस्थानचे कर्मचारी संजय पवार व सचिन शेटे यांना अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली असून आज (सोमवार) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात अ‍ॅप मालकांनी करारानुसार देवस्थानच्या खात्यात पाठवावयाची रक्कम थेट कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे समोर आल्याने संशयाची साखळी अधिक गडद बनली आहे.

देवस्थानने चार अ‍ॅपना अधिकृतरित्या भाविकांना ऑनलाईन सेवा देण्यास मान्यता दिली होती. करारानुसार ठरावीक रक्कम देवस्थानच्या अधिकृत खात्यावर वर्ग करणे आवश्यक होते. मात्र व्यवहार कर्मचार्‍यांच्या वेगळ्या खात्यांमधून झाल्याने आर्थिक अनियमिततेचा स्पष्ट संशय निर्माण झाला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की अ‍ॅप मालकांची चौकशी झाल्यानंतर संपूर्ण व्यवहाराची साखळी स्पष्ट होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles