नगर- पाथर्डी रोडवरील हॉटेल समाधानसमोर भिंगार येथे किरकोळ अपघाताच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यात तरुणाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
फिर्यादी आयुष विकास साळवे (वय 18, रा. गवळीवाडा, भिंगार) यांच्या दुचाकीचा आरोपीच्या दुचाकीला धक्का लागला. याच क्षुल्लक कारणावरून आरोपी विकी गायकवाड, अक्षय गायकवाड, निलेश शिंदे, गणेश पंडित आणि आकाश तांबे (सर्व रा. भिमनगर, भिंगार) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात तसेच दगडाने पायावर व नाकावर मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आयुष साळवे यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार रेवणनाथ दहिफळे हे तपास करत आहे.


