नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा शिवारात मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही गटांचे चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादींवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत राजाराम विठोबा कारंडे (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत कारभारी कारंडे, सचिन हनुमंत कारंडे, सार्थक हनुमंत कारंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी संशयित आरोपींनी लाकडी काठी, लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी राजाराम कारंडे व अनिल राजाराम कारंडे हे दोघे जखमी झाले आहेत.
या घटनेतील दुसऱ्या बाजूने हनुमंत कारभारी कारंडे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम विठोबा कारंडे, अनिल राजाराम कारंडे, सिताबाई राजाराम कारंडे, गिता अनिल कारंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर शिवीगाळ करून, लोखंडी शिवळ व लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. दरम्यान यां घटनेची माहिती अहिल्यानगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.


