Friday, February 20, 2026

अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप! भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मोठे विधान…

पिंपरी : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत कशापद्धतीने जोडले गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीत सांगायचे की थोडा विचार करावा. आता पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत असल्याचे’, मोठे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी निगडीत केले. कोणाच्या जीवावर कोण काय बोलतोय, असा सवालही त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर संजोग वाघेरे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी महापालिकेतील भाजपच्या राजवटीतील कारभारावर गंभीर आरोप केले होते. त्याला चव्हाण यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.चव्हाण म्हणाले, ‘निवडणुकीत खोटे कथानक पसरविण्यासाठी काही खासगी संस्था सल्ला देतात. अजित पवार हे केंद्र, राज्यात आमच्यासोबत जोडले आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सल्ला देणाऱ्या संस्थेने (एजन्सी) सांगितल्याशिवाय पवार खोटे आरोप करणार नाहीत. त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकपणे काम होईल, याकडे केंद्र, राज्यातील नेत्यांचे लक्ष असते. निवडणुकीनंतर ते झाले होते, जाऊ दे असे पवार हसतहसत म्हणतील. सध्या खोटे बोल पण रेटून बोल, या पद्धतीने ते चालले आहेत. भाजपची संघटनेची ताकद चांगली आहे. मतदार सुज्ञ असून विकासाला प्राध्यान्य देईल. महापौर भाजपचाच होईल’.

पवार यांनी केलेले आरोप स्थानिक आमदारांनी का फेटाळले नाहीत, असे विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री पदावर असलेला एवढा मोठा माणूस आरोप करतो. त्यावेळी त्याच्याएवढी उंची असलेल्या कोणी तरी येऊन बोलावे असे अपेक्षित असते. भाजप शिस्तीचा पक्ष आहे. कोणी आरोप केले, तर त्याचे उत्तर कोणी द्यावे, याचे काही ताळतंत्र, नियम आम्ही ठेवले आहेत. त्या नियमाप्रमाणे आम्ही वागतो. सिंचनामध्ये ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांमध्ये सत्तेत सहभागी आहे असे अजित पवार यापूर्वी कधी म्हटले नाहीत. आता सल्ला देणारी संस्था बदलली आहे. त्यामुळे या संस्थेला माहिती कमी असेल’.

पवार यांना काही संस्था स्क्रिप्ट लिहून देतात. आज कोणता शर्ट घालायचा, तो लकी आहे. हे वाक्य म्हटले तर चांगली प्रसिद्धी होईल. या सर्व गोष्टी संस्था करतात. संस्था भाड्याने घेतल्या जातात. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे हजारो लोकांना कंपन्यात बसवून ‘ट्रोल’ करायला पैसे दिले जातात. मी, माझा पक्ष किती प्रसिद्ध आहे, हे सांगण्याचे काम करतात. त्यांच्याकडून ‘स्क्रिप्ट’चे वाचन केले जाते, असेही चव्हाण म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles