अहिल्यानगर : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप दहशत निर्माण करत आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांना धमकावून, दमबाजीने, दहशत निर्माण करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले. त्यातून राष्ट्रवादी व भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही दहशत मोडून काढण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली आहे. शहरातील ताबेमारीच्या विरोधात व्यापाऱ्यांमध्ये असलेली खदखद मतदानातून व्यक्त होईल, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेने १० उमेदवार पुरस्कृत केले आहेत. त्यामध्ये अश्विनी विलास सांगळे (१ क), उषा मंगेश भिंगारदिवे (२ क), संदीप यादव (२ डॉ), अशोक शामराव दहिफळे (५ ब), धनश्री सागर साठे (५ क), अमित दत्तात्रय खामकर (६ अ), मंगला गोरख धस (१६ अ), हर्षवर्धन कोतकर (१६ ड), गौरी गणेश ननावरे (१७ ब) दत्तात्रय खैरे (१७ डॉ) यांचा समावेश आहे. याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत अनिल शिंदे व सचिन जाधव बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संभाजी कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख स्वाती जाधव तसेच पुरस्कृत उमेदवार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेचे एकूण ४९ उमेदवार रिंगणात आहेत.आपण काही दिवसांपूर्वी लावलेला प्रचाराचा फलक काढून घ्यावा म्हणूनही जाहिरात संस्थेला धमकावण्यात आल्याची तक्रार अनिल शिंदे यांनी केली. शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांनी नगर शहरातील दहशतीच्या विरोधात आवाज उठवला. तो आवाज कोणाविरुद्ध होता, हे नगर शहरातील नागरिकांना माहिती आहे. तेच लोक आजही दहशत निर्माण करत आहेत. प्रशासनाने अशा लोकांना हद्दपार करून शहरात शांतता ठेवावी, अशीही मागणी शिवसेनेने केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या फेरीसाठी झालेली गर्दी ही गोळा केलेली व मागवलेली होती. मनापासून कार्यकर्ते त्यात सहभागी नव्हते, कारण ही गर्दी कशा पद्धतीने गोळा केली होती, हे शहराला माहिती आहे, अशी टीकाही सचिन जाधव यांनी केली. शहरातील व्यापाऱ्यांमध्ये ताबेमारीच्या घटनांच्या विरोधात खदखद आहे. गेल्या काही वर्षात ताबेमारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. त्यास राष्ट्रवादी व भाजपचा दहशतीचा चेहराही कारणीभूत ठरला आहे असाही आरोप जाधव यांनी केला.
प्रभाग १ मधील शरद पवार गटाच्या उमेदवाराला रिवाॅल्वर दाखवण्यात आल्याची तक्रार आहे, या संदर्भात बोलताना संभाजी कदम म्हणाले, प्रशासनाची जबाबदारी आहे शहरात शांतता ठेवण्याची. अशा व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई करावी


