“नगरपरिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदान झालं. अनेक व्हिडिओ देखील समोर आले. आमचा संविधानावर विश्वास असून सत्य पुढे घेऊन जात आहे. आम्ही सत्तेचा खेळ नाहीतर लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने लढत आहोत. इंग्रज जुलमी होते. त्यांच्याकडे हुकूमशाही आणि दंडेलशाही होती. त्यावेळी काँग्रेसने संघर्ष उभा केला. ज्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली, तेव्हा अहिल्यानगरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
“आज त्याचं पद्धतीचं काम सुरू आहे. विरोधक प्रचाराला फिरू नये यासाठी हेलिकॉप्टर, हेलिपॅड ब्लॉक करुन ठेवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही नागरिकांना अर्थात हात देत आहोत. निवडणुकीत रस्ते, पाणी, ट्रॅफिक, पथदिवे, सुरक्षा, सौंदर्य हे मुद्दे प्रचारात पाहिजेत” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी काही लोकांना नेमून दिलं आहे. त्यात पहिले नगरचे देखील नाव येतं. विलासराव देशमुख यांच्या बद्दल वक्तव्य केलं. त्याचा आम्ही निषेध करतो. भाजपाला विलासरावंसह गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शरद पवारांचे नावे पुसून टाकायचे आहे” असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
“भाजपने गेल्या काही वर्षात अटलजींच्या नावाने कोणतीही योजना आणली नाही. त्यामुळे त्यांना अटलजी, अडवाणी, हेडगेवार, गोळवलकर यांचेही नाव पुसायचे आहे. नागपूर संघ कार्यालयातील गोळवलकर आणि हेडगेवार यांचे पुतळे काढून तिथे मोदी आणि शहांचे पुतळे बसवायचे आहेत” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, शरद आहेर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, माजी नगरसेवक संजय झिंजे, बाळासाहेब भंडारी, फिरोज खान आदींसह उमेदवार व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


