IAS अधिकारी पदावरुन बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पुजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती फोन करुन चतुःश्रृंगी पोलीसांना दिली आहे.
पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह अनेक नोकर रहातात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले होते. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला असं पुजा खेडकरने सांगितले आहे. बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पुजाने दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले आणि पोलीसांना फोन केला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलीसांच पथक खेडकर यांच्या घरी पोहोचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. पोलीसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पुजा खेडकरने स्वतः दुसऱ्या फोनवरुन फोन करुन हा प्रकार पोलिसांना कळवला आहे. मात्र तीने अद्याप लेखी तक्रार पोलीसांकडे दिलेली नाही. आपली मनस्थिती व्यवस्थित झाली की आपण तक्रार देऊ असं तिनं पोलिसांना सांगितलं आहे. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरी झाल्या आहेत, याचीही माहिती तिनं अद्याप पोलीसांना दिलेली नाही.


