राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अमरावतीमध्ये भाजप ॲक्शन मोडवर आले आहे. मतदानाच्या ३ दिवस आधी भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजपने १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. येत्या काही दिवसात आणखी पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती भाजपचे अमरावतीमधील शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजपने मोठी कारवाई केली. अमरावती शहरातील भाजप पक्षातील १५ पदाधिकारी आणि सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कार्यवाही केली असून पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर अधिकृत उमेदवारांविरोधात उघड बंडखोरीचा आरोप करण्यात आला आहे. तसंच, त्यांनी पक्ष निर्णयांना विरोध आणि अपप्रचार केल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याचे स्पष्ट होताच सर्वांना प्राथमिक सदस्यत्व आणि पदांवरून तात्काळ निलंबन करण्यात आले. आणखी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले.


