महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचाराच्या अनुषंगाने राज्यभरात विविध नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
असं असतानाच महापालिका निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? अशाही चर्चा आहेत. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांवर अजित पवारांनी थेट भाष्य करणं टाळलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कशा आल्या? यावर भाष्य केलं. ‘आमच्या काही कार्यकर्त्यांचे विचार जुळले आणि त्यानंतर आम्ही ग्रीन सिग्नल दिला’, असं अजित पवारांनी म्हटलं. ते ‘मुंबई तक’च्या मुलाखतीत बोलत होते.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? तुम्ही तोपर्यंत एकत्र येणार, अशा चर्चा सुरू आहेत. या फक्त चर्चाच आहेत का? यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी मीडियातूनच अशा सगळ्या बातम्या ऐकल्या. आता काय होतं, मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यानंतर बातम्या सुरू झाल्या. आताही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र, निवडणूक एकत्र लढवत असले तरी त्यांनी दोघांचे पक्ष वेगवेगळे ठेवले आहेत. त्यांनी फक्त जागावाटप केलेली आहे. आता त्या दोघांच्या मनात काय आहे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कारण ते दोघेही पक्षाचे प्रमुख आहेत”, असं सूचक भाष्य अजित पवार यांनी केलं आहे


