अहिल्यानगर: महापालिका निवडणूक प्रचारादरम्यानची आचारसंहिता भंग होत असल्याच्याबिबट्या एकूण आठ तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीमध्ये कारवाई करत रोख रक्कम पकडल्याचा एक गुन्हा भरारी पथकाने पोलिसांकडे दाखल केला आहे. दरम्यान पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने आत्तापर्यंत सुमारे ३८ लाख रुपये किंमतीची अवैध दारू जप्त करण्याची कारवाई केली आहे.
दरम्यान उद्या, मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होत आहे. त्यानंतरच्या कालावधीत आचारसंहिता भंगाच्या अधिक स्वरूपाने तक्रारी प्राप्त होणार असल्याचा अंदाज निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामध्ये विशेषतः पैसे वाटपाच्या तक्रारी अधिक असतील असा कयासही व्यक्त केला जात आहे.
निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता सुरू होताच प्रतिबंधासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करून प्रभाग निहाय १७ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर या भरारी पथकाकडून त्याची पडताळणी केली जाते. पैसे वाटप होत असल्याच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी एकामध्ये तथ्य आढळले. दिल्ली दरवाजा भागात दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या, त्यापैकी एका मोटरसायकलीच्या डिकीमध्ये १ लाख रुपये रोख व दोन महागडी घड्याळे असा १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज आढळला. त्याचे स्पष्टीकरण न मिळाल्याने मोटरसायकल मालकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भरारी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. पैसे वाटपाच्या इतर दोन तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही. यातील एक तक्रार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचीही होती. त्यांनी केडगाव उपनगरात पैसे वाटप होत असल्याची तक्रार केली होती.याशिवाय प्रभाग १० मधील ‘होम मिनिस्टर’चा कार्यक्रमामध्ये भेटवस्तूंचे वाटप होत असल्याची तक्रार प्राप्त झाली तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्ली दरवाजा येथील सभेसाठी दुकाने बंद करायला लावली असा उमेदवार गिरीश जाधव यांचा आक्षेप, यामध्ये भरारी पथकाला तथ्य आढळले नसल्याचे आचारसंहिता कक्षाकडून सांगण्यात आले. उमेदवार श्रीकांत छिंदम यांनी आपली समाज माध्यमातून बदनामी करणारा प्रचार होत असल्याची तक्रार केली, त्याची पडताळणी भरारी पथकाकडून सुरू आहे.
आचारसंहिता जारी झाल्यानंतरच्या गेल्या पंधरा दिवसात पोलिसांनी शहराच्या विविध भागातून ४ लाख ७९ हजार २९३ रुपये किमतीची दारू तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३३ लाख ५ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू अशी एकूण सुमारे ३८ लाख रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.


