महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमच्या ओवैसींच्या एमआयएमचा मोठा करिश्मा पाहायला मिळाला. अनेक महाालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 नगरसेवक विजयी झाले आहेत.
सोलापूर, धुळे आणि नांदेडमध्ये एमआयएमचे प्रत्येकी 8, 10 आणि 15 असे एकूण 33 उमेदवार विजयी झाले आहेत. तर मुंबई महापालिकेमध्येही एमआयएमने मुसंडी मारत तब्बल 8 जागांवर विजय मिळवला आहे. मुस्लिमबहुल परिसरात समाजवादी पार्टीला मागे सारत अनेक ठिकाणी एमआयएमची सरशी झाल्याचं दिसून आलं. तर एमआयएमचे अमरावतीत 12, ठाण्यात 5, नागपुरात 6 नगरसेवक विजयी झाले आहेत सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. सोलापूर मनपा निवडणुकीत 8 जागावर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग 14 आणि प्रभाग 20 या दोन्ही प्रभागातील 8 ही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेत भाजपनंतर एमआयएम दुसरा मोठा पक्ष ठरला आहे.नागपूरमधील प्रभाग क्रमांक तीन- ड मधून एमआयएमच्या आलिशा फहीम खान विजयी झाल्या आहेत. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानची आलिशा या पत्नी असून त्यांच्यासह अजून दोन उमेदवार जिंकल्याची माहिती आहे. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये एमआयएमचे तीनही उमेदवार जिंकले आहेत.
मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या सर्वाधिक जागा
मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील इस्लाम पार्टीने 35 आणि समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर पश्चिम भागात शिवसेनेने (शिंदे गट ) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला. माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
1. सोलापूर – 8
2. संभाजीनगर – 33
3. मालेगाव – 20
4. मुंबई – 8
5. नागपूर – 6
6. अहिल्यानगर – 2
7. जालना – 2
8. ठाणे – 5
9. नांदेड – 15
10. चंद्रपूर – 1
11. धुळे – 10
12. अकोला – 3
13. अमरावती – 12
एकूण – 125


