अहिल्यानगर -भिंगार येथील वडारवाडी भागात दोन गटात राडा झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात सहा जणांच्या टोळक्यांने दगडफेक, तोडफोड, मारहाण केली. याप्रकरणी अनिल दत्तू डोकडे ( रा. वडारवाडी, भिंगार, जि. ता. अहिल्यानगर ) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप तागडकर, प्रीतम तागडकर, सोमेश तागडकर, ऋषीकेश तागडकर, स्वप्नील तागडकर आणि सुरज तागडकर सर्व ( रा. वडारवाडी, भिंगार, जि. ता. अहिल्यानगर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी अनिल दत्तू डोकडे १८ जानेवारी रोजी रात्री काम संपवून घराकडे जात असतांना म्हस्के रुग्णालयाजवळ आरोपींनी त्यांना अडवले. वरील आरोपीसह त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत अनिल डोकडे आणि त्यांचे मित्र संजय धोत्रे हे दोघेही जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. भिंगार पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे आणि मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार दहीफळे करत आहेत.
आकाशवाणी केंद्रासमोर महिलेचा विनयभंग
शहरातील आकाशवाणी केंद्रासमोर अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणाऱ्या कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.महानगरपालिकेच्या खासगी कंत्राटानुसार अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्यासाठी तक्रारदार महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी रात्री त्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसह प्रोफेसर चौक भागात गस्तीवर होत्या. यावेळी आकाशवाणी केंद्रासमोरील एका मोबाईल दुकानासमोर एक मोपेड दुचाकी रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी असल्याचे त्यांना दिसले. वारंवार सूचना देऊनही संबंधित तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा महिला कर्मचाऱ्यांनी ती दुचाकी टोईंग वाहनावर उचलण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने संतापून तक्रारदार महिलेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याचा गुन्हा नोंदवला आहे.


