राहुरी तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील नंदादीप लॉजिंग येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत देहव्यवसाय चालविणार्या हॉटेल व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 20 जानेवारी रोजी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली गावच्या शिवारातील नंदादीप लॉजिंगमध्ये अज्ञात इसम आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत असून लॉजिंगच्या खोल्यांमध्ये कुंटणखाना चालविला जात आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना सूचना देऊन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मदतीने तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पंच व पोलीस पथकासह नंदादीप लॉजिंगवर छापा टाकण्याची तयारी करण्यात आली.छापा टाकण्यापूर्वी खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एका खाजगी इसमास बनावट ग्राहक म्हणून लॉजिंगमध्ये पाठविले. लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यावेळी हॉटेलच्या काऊंटरवर असलेल्या इसमाने आपले नाव अमोल रामचरण अहिरवार (रा. नंदादीप, चिंचोली, ता. राहुरी, मूळ रा. खजरी, दमोह, मध्यप्रदेश) असल्याचे सांगितले व आपण हॉटेल व्यवस्थापक असल्याची कबुली दिली. मात्र हॉटेल मालकाचे नाव सांगण्यास त्याने नकार दिला. पंचासमक्ष लॉजिंगची तपासणी केली असता एक महिला आढळून आली. चौकशीत सदर महिला पश्चिम बंगाल राज्यातील असून हॉटेलचा मालक व व्यवस्थापक यांच्या माध्यमातून तिच्याकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती तिने दिली.
ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम तिला दिली जात असल्याचेही तिने सांगितले. पोलिसांनी सदर महिलेची सुरक्षितपणे सुटका केली आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक अमोल रामचरण अहिरवार व अनोळखी हॉटेल चालक/मालक यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सतिष पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सहभागी होते.


