अहिल्यानगर महापालिकेचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. राज्यातील महापालिकांसाठी मुंबईत आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अहिल्यानगर महापालिकेचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप यांच्या युतीने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने महापौर पदावर राष्ट्रवादीचा दावा प्रबळ ठरणार आहे. ओबीसी महिला प्रवर्गातून राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी तीन महिला निवडून आलेल्या आहेत.
मात्र ओबीसी प्रमाणपत्र असलेली महिला खुल्या प्रवर्गातून निवडून आलेली असली तरी ती महापौर पदाच्या निवडीसाठी पात्र ठरू शकत असल्याने अहिल्यानगरच्या महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढणारी आहे.
महापालिकेच्या १७ प्रभागातून ६८ जागा आहेत. निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटाला २७, भाजपला २५, शिवसेना (शिंदे गट) १०, ठाकरे गट १, काँग्रेस २, एमआयएम २, बहुजन समाजवादी पक्ष १ असे संख्याबळ मिळालेले आहे.
यापूर्वी निवडणुकीच्या आधीच महापौर पदाचे आरक्षण जाहीर केले जात असे. यंदा प्रथमच निवडणूक झाल्यानंतर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. आज, गुरुवारी काढलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अहिल्यानगर महापालिकेचे महापौर पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
राष्ट्रवादी व भाजप युतीमध्ये राष्ट्रवादीची संख्याबळ अधिक आहे. मात्र भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप महापौर पदाचा निर्णय झालेला नाही असे सांगितलेले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात महापौर पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पालकमंत्री विखे यांनी प्रतिष्ठेसाठी भाजपकडे हे पद हवे असा आग्रह धरल्यास ते भाजपला मिळू शकते. अन्यथा अधिक संख्या बळाच्या आधारावर आमदार संग्राम जगताप ते राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेतील.
राष्ट्रवादीकडे ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या सुजाता पडोळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे आशा डागवाले नगरसेविका आहेत तर भाजपकडे शारदा ढवण, आशा कातोरे व पुष्पा बोरुडे सुनीता फुलसौंदर यांचा समावेश आहे. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या नसल्या तरी ओबीसी महिला म्हणून राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे, आशा डागवाले, सुनीता फुलसौंदर यांचीही नावे महापौर पदासाठी चर्चेत येऊ शकतात.
महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी अद्याप महापौर पदाच्या निवडीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा होईल.


