अहिल्यानगर -विनापरवाना विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी एमआयएमचे नवनिर्वाचित नगरसेवक खालीद दिलदार शेख आणि हाजी शेहबाज सय्यद यांच्यासह कार्यकर्त्यांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करून मिरवणूक काढणे नवनिर्वाचित नगरसेवकांना महागात पडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 14 ते 27 जानेवारी दरम्यान जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. असे असतानाही, 21 जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास मुकुंदनगरमधील नाज चौक येथे कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता 120 ते 125 कार्यकर्त्यांच्या जमावासह ही मिरवणूक काढण्यात आली होती. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार अजय सदाशिव गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार इनामदार करत असून, निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पत्नीने केली पतीला मारहाण
शहरातील शिवाजी नगर भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पत्नीने पतीला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जखमी पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आनंदपार्क येथील शुभ सदन बंगल्यात सदर प्रकरणातील कुटुंब वास्तव्यास आहे. 21 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी पती त्यांच्या लहान मुलाला हॉलमध्ये बसून जेवण भरवत होते. यावेळी पत्नीने ’मी मुलाची काळजी घेण्यास सक्षम आहे, तू त्याला खाऊ घालू नको’ असे म्हणून मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. पतीने शांत राहण्यास सांगितले असता, पत्नीचा राग अनावर झाला. पत्नीने ’तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन आणि तुला नोकरी करू देणार नाही’ अशी धमकी देत पोटात लाथ मारली, तसेच शेजारी पडलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.
Ahilyanagar ….एमआयएमच्या दोन नवनिर्वाचित नगरसेवकांवर गुन्हा दाखल
- Advertisement -


