2026. राज्याच्या राजकारणात हादरवणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे. या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
उद्या 29 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुंटुंबानी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे आणले जाणार असल्याची माहिती आहे.अजित पवार हे धडाडीचे नेते होते. राज्यातील असो किंवा केंद्रातील, प्रत्येक नेत्यांशी त्यांचे जवळचे आणि चांगले नाते होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोटो शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी शरद पवार यांना सांत्वनपर फोन देखील केला होता. दरम्यान, उद्या ते स्वत: बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहतील. तसेच केंद्रातील आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहतील. या कारणास्तव बारामतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आल्याची माहिती आहे.महाराष्ट्रात अजित पवार यांची ओळख ‘लाडके दादा’ म्हणून होती. दादांना सामान्यांकडून भरभरून प्रेम आणि साथ मिळाली. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो जनता बारामतीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळताच काही जण बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहे. उद्या बारामतीत लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, बारामती शहरात शोकाकूल वातावरण तयार झाले असून, असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा बांध फुटला आहे.


