Monday, February 23, 2026

पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक ; नगर तालुक्यातील शेतकर्‍याची फिर्याद

अहिल्यानगर -पोस्ट ऑफिसमधील फिक्स डिपॉझिट व विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील शेतकर्‍यासह गावातील 40 ते 50 नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुखदेव दगडू ठोकळ (वय 53, रा. कामरगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बबन साहेबराव शेलार (मुळ रा. गुंफा, भातकुडगाव, ता. शेवगाव, सध्या रा. फत्तेपुर, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बबन शेलार याने 6 जुलै 2024 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत कामरगाव पोस्ट ऑफिस येथे फिर्यादी सुखदेव ठोकळ व इतर नागरिकांचा विश्वास संपादन केला.

शेलार याने पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट व इतर योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे सांगून फिर्यादीकडून नऊ लाख रूपये घेतले. मात्र या रकमेच्या बदल्यात बनावट नोंदी करून विश्वासघात केला व आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकरणाची माहिती ठोकळ यांनी अहिल्यानगर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी बुधवारी (28 जानेवारी) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.दरम्यान, संशयित आरोपीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता अधिकृत शासकीय योजनांची खातरजमा करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles