राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बारामती येथे विमानाचे लँडींग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात ) झाला अन् अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर कार्यकर्त्याच्याही भावना अनावर झाल्या असून अनेकजण या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत. त्यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधींशांच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही काही प्रश्न उपस्थित करत, या अपघातानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख तीन नेते मौन का बाळगून आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण, खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करु असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही? अजित दादांच्यानंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. साहेबांचे राष्ट्रवादीतलेही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही हे महाराष्ट्राचे नुकसान आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबंधित अपघाताच्या घटनेवर परखडपणे भाष्य करत, हा निव्वळ अपघात असून यामागे कुठलेही राजकारण आणू नये, असे म्हटले होते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यासंदर्भात नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्रही दिलं आहे. मात्र, या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही संबंधित घटनेचं सत्य जनेतसमोर यायलं हवं, त्यासाठी चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे. आता, सुषमा अंधारेंनीही संजय राऊतांची री ओढली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच निशाणा साधला आहे.


