महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटीच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. २८ जून २०२६ रोजी होणारा टीईटीचा पेपर आदल्याच दिवशी फुटल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. परंतू यावेळी विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभागृहातून सभात्याग केला.पोलिसांना २७ जून २०२६ रोजी टीईटीची प्रश्नपत्रिका विकली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्या तपासात २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेचे मूळ पेपर आढळून आले. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नपत्रिकांची खातरजमा केली असता, त्या खऱ्या असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मुख्य आरोपी राजू श्री प्रयाग शाव याच्यासह इतर दोघांविरुद्ध भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २८१/२०२६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम २०२४ च्या कडक कलमान्वये कारवाई करण्यात आली असून, तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
शिक्षण मंत्र्यांनी उमेदवारांना दिलासा देताना जाहीर केले की, ही फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, कारण त्यांचे शुल्क आधीच स्वीकारण्यात आले आहे. तसेच, पुढील वर्षापासून टीईटीसह सर्वच परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने ‘ऑनलाइन’ घेता याव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.


