उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री पदाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच, पुढील महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, अर्थमंत्री म्हणून अजितदादा हा अर्थसंकल्प सादर करणार होते. आता अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबद्दलही फडणवीस यांनी माहिती दिली.
राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, याबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, “कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून भाजप पक्ष म्हणून उभे राहू. अजित दादाचा कुटुंब असो किंवा राष्ट्रवादीचे पक्ष असेल. त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन असेल’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आता तरी असं आहे की, अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. उद्यापासून मी स्वत: अर्थसंकल्पाच्या जी काही प्रक्रिया आहे, त्यात लक्ष घालून जी काही प्रक्रिया आहे, ते पूर्ण करेल. त्यानंतर आम्ही अर्थसंकल्प कोण सादर करणार हे ठरवू आम्ही एकत्रपणे ठरवू.’ असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.


