अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाटेफळ शिवारातील हायवेवर भीषण अपघात
अहिल्यानगर – तालुक्यातील वाटेफळ शिवारात असणाऱ्या विश्वशांती हॉटेलजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दत्तात्रय कोंडीबा गाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश दत्तात्रय गाडे आणि त्यांचे वडील दत्तात्रय गाडे हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH-16-DU-5344) जात असताना ही घटना घडली. अज्ञात वाहनावरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगात आणि हयगईने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीला गंभीर दुखापत झाली, तर त्यांचे वडील दत्तात्रय गाडे यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. फिर्यादीने दिलेल्या दवाखाना जबाबावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वांढेकर हे सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


