छत्रपती संभाजीनगर: येथील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक विजयी झाले असून एमआयएम संभाजीनगर महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. येथे भाजपने 57 नगरसेवक जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, सत्ता स्थापनेसाठी अवघ्या एका जागेचं संख्याबळ भाजपला कमी पडलं आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप विरुद्ध इतर राजकीय पक्षांची महापौर आणि सत्ता स्थापनेसाठी आघाडी होणार का, एमआयएमची भूमिका काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबईनंतर राज्यातील महत्त्वाची महानगरपालिका म्हणून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख होतो. राजकारणात काहीही होऊ शकते, येत्या 10 तारखेला महापौपपदाची निवडणूक असल्यानं त्यावेळी पत्ते उघडू, असे म्हणत जलील यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएम आपला उमेदवार देणार आहे. सध्या MIM च्या नगरसेवकांचे संख्याबळ पाहिले तर काहीतरी धक्कादायक होऊ शकते, अशी परिस्थिती येथील महापालिकेत आहे. आमची विविध पक्षासोबत चर्चा सुरू आहे. येत्या 10 तारखेला महापौपपदाची निवडणूक असल्यानं, त्यावेळी पत्ते उघडू असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचाही विचार करू, काहीतरी वेगळे होऊ शकते, त्यासाठी चर्चा सुरू असल्याचंही इम्तियाज यांनी म्हटलं आहे. जलील यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एमआयएमला पाठिबा देणार का? हे पाहावे लागेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या 115 असून महापौर पदासाठीची मॅजिक फिगर 58 आहे. बहुतमताचा आकडा गाठण्यासाठी 58 नगरसेवकांची गरज असताना, येथे भाजप-शिवसेना स्वबळावर लढल्याने सत्तास्थापनेसाठी युती होणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. येथील महापालिका निवडणुकीत भाजपचे 57 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांना एका नगरसेकाची गरज आहे. भाजपा वगळून इतर सगळे एकत्र आले तर भाजपा सत्तेपासून दूर राहू शकेल. पण, ही जवळपास अशक्य प्राय गोष्ट आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील राजकारण पाहता राजकारणात काहीही होऊ शकतो हेही सत्य नाकारता येत नाहीत. त्यासाठी, एमआयएमचे 33, एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे 13, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6, वंचितचे 4 आणि काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रत्येकी एक एवढ्या सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपविरुद्ध हे सर्व पक्ष एकत्र आल्यास मॅजिक फिगर 58 पूर्ण होऊन भाजपला सत्तेपासून रोखता येईल. मात्र, राज्यातील महायुती लक्षात घेता भाजप-शिवसेना महायुती सत्ता स्थापनेची जास्त शक्यता आहे.
संभाजीनगर महापालिकेतील संख्याबळ – 115
भाजप 58
MIM 33
शिवसेना 13
UBT शिवसेना 6
काँग्रेस 1
वंचित 4
NCP SP 1


