नगर तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक ;वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास 9 फेब्रुवारीपासून उपोषण

अहिल्यानगर-तालुक्यातील रुईछत्तीसी गावात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसाय, डान्सबार, महिला वेटर सर्व्हिस व अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास 9 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रुईछत्तीसी ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर करून उपोषणाची पूर्वसूचना दिली आहे. रुईछत्तीसी ग्रामसभा यापूर्वी राज्यभर चर्चेत राहिली असून, या अवैध धंद्यांमागे कोणाचे पाठबळ आहे, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक पाठबळाशिवाय असे अवैध व्यवसाय उघडपणे सुरू राहणे शक्य नाही. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मुंबई दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकल्यानंतर बांगलादेशातील काही तरुणी आढळून आल्याने गावाची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकारांमुळे गावातील तरुणांचे विवाह जुळणे कठीण झाले असून, बाहेरील मुली या गावातील तरुणांना नकार देत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्याने आजवर कधीही न जमलेली मोठी ग्रामसभा यावेळी भरली होती.

30 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत अवैध वेश्याव्यवसाय, डान्सबार, कला केंद्र व लेडीज सर्व्हिस सेंटर कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच या विषयावर रुईछत्तीसी येथील सचिन अशोक भंवर यांनी संबंधित व्यवसाय बंद न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, याबाबतचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नगर तालुका पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles