महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. यामुळे महापालिकेत आता दोन्ही राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ मधून निवडून आलेले अजित रावराणे यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर रावराणे यांनी महायुतीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे बळ आणखी वाढले आहे.
गेल्या काही काळापासून प्रभागातील विकासकामांसाठी आवश्यक असणारा निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याशिवाय विकास शक्य नाही. तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुती सरकारकडून सहकार्य मिळवण्याचे आश्वासन मिळाले आहे, त्यामुळे मी पाठींबा जाहीर केला आहे, अशी माहिती अजित रावराणे यांनी दिली.


