Thursday, February 19, 2026

अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण…तातडीने मंजुरी मिळावी यासाठी

प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी केंद्राकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा

नगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर–पुणे नवीन दुहेरी (डबल लाईन) रेल्वेमार्गाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार झाला असून, या प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

केंद्र सरकारच्या पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत पुणे–नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विविध टप्प्यांवर काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३३ किलोमीटर लांबीचा अहिल्यानगर–पुणे नवीन डबल लाईन रेल्वेमार्ग प्रस्तावित असून, हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील भागातून जाणार आहे.

या संदर्भात खासदार लंके म्हणाले की, हा प्रकल्प केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा नसून शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात थेट सकारात्मक बदल घडवणारा आहे. डीपीआर तयार होणे ही महत्त्वाची पायरी असून, आता मंजुरी व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे.

अहिल्यानगर परिसरात यापूर्वीच रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. पुणतांबा –निंबळक दुहेरीकरण पूर्ण, निंबळक–अहिल्यानगर दुहेरीकरण प्रगतीपथावर असून, साईनगर शिर्डी–पुणतांबा दुहेरीकरणाला मंजुरी मिळाल्याने अहिल्यानगर हा पुणे, नाशिक, शिर्डी आणि मराठवाडा मार्गांचा केंद्रबिंदू ठरत आहे.

अहिल्यानगर–पुणे डबल लाईन प्रकल्पामुळे शेतमाल वाहतूक सुलभ होईल, उद्योगांना चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि धार्मिक पर्यटनालाही लाभ होईल, असेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनातील संबंधित विभागांशी समन्वय साधून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles