अहिल्यानगर-शिरूर (जि. पुणे) पोलिसांनी अटक केलेला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्यामसुंदर गुजर हाच ड्रग्ज तस्करीचा मास्टर माईंड निघाला. त्याला यापूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर जप्त मुद्देमालाचा अपहार केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल गुजर यांच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेल्या गुजर यांने जिल्हा पोेलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एक कोटी 9 लाख 75 हजारांचे 10 किलो 975 ग्रॅम ड्रग्स चोरल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुणे ग्रामीण एलसीबी व शिरूर पोलिसांनी 18 जानेवारी 2026 रोजी संयुक्त कारवाई करीत शिरूर शहरातील डंबेनाला परिसरातील बाबुरावनगर मोकळ्या मैदानात ड्रग्ज विक्रीसाठी येणार्या गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय 41) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो 52 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले.याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी आरोपी शादाब शेख याचा अहिल्यानगर एलसीबीतील गुजर याच्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांनी अहिल्यानगर एलसीबीतील कर्मचारी गुजर याला चौकशी कामी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करून आणलेले ड्रग्ज मुद्देमाल कक्षातून चोरून विक्री केल्याच्या संशयावरून 21 जानेवारी 2026 रोजी अटक केली. या गुन्ह्यात पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी गुजर याला पोलिस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची तोंडी आदेशानुसार जबाबदारी देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केलेले अल्प्राझोलम ड्रग्ज एक पांढर्या रंगाच्या गोणीत भरून ठेवले होते. गुजर याने त्या गोणीतील 10. 975 किलो ग्रॅम ड्रग्ज काढून त्या जागी मैदा भरला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. त्या समितीने पोलिस मुख्यायातील मुद्देमालाची पाहणी करून मोजदाद केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 17 डिसेंबर 2025 रोजी श्रीरामपूर येथे कारवाई करून जप्त केलेल्या ड्रग्जमधून गुजर याने ड्रग्ज चोरी केल्याचे दिसून आले. त्याने पांढर्या रंगाच्या गोणीतील अल्प्राझोलम याचे 10.975 किलो ग्रॅम ड्रग्ज चोरी केले. त्याची बाजारात 1 कोटी 9 लाख 75 हजार रुपये किंमत आहे. पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याने मुद्देमालाचा अपहार केल्याचा अहवाल सादर केला. त्या अहवालावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कबाडी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कलुबर्मे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, कोतवालीचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या समितीने चौकशी केली. समितीने तब्बल दोन दिवस मुद्देमाल कक्षाची पाहणी करून मोजदाद केली होती. तसा अहवाल दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


