Friday, February 20, 2026

शिक्षकांच्या ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची शिक्षक परिषदेची मागणी

ऑनलाईन कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांवरील मानसिक ताण तात्काळ दूर करा
ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची शिक्षक परिषदेची मागणी
शिक्षकांवर अशैक्षणिक व ऑनलाईन कामांचा मारा -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऑनलाईन कामाच्या अतिरेकामुळे शिक्षकांवर निर्माण झालेला प्रचंड मानसिक ताण तात्काळ संपुष्टात आणण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग तसेच शिक्षण संचालक यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना सुजाण, सुसंस्कृत व सुशिक्षित नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतो व समाज घडविण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र शिक्षक नियुक्तीचा मूळ उद्देश आणि हेतू विचारात न घेता शासन व प्रशासनाकडून शिक्षकांवर सातत्याने विविध अशैक्षणिक कामे लादली जात आहेत, अशी तीव्र भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अध्यापनाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत अध्यापनाबरोबरच ऑनलाईन अहवाल सादर करणे, विविध लिंक भरणे, छायाचित्रे व व्हिडीओ तयार करणे, विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन लिंकद्वारे अपलोड करणे, प्रत्येक कार्यक्रम, सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, मराठी पंधरवडा, विविध विषय पंधरवडा आदी उपक्रमांचे फोटो, व्हिडीओ, लेखी अहवाल व विद्यार्थ्यांच्या कृतीचे पुरावे ऑनलाईन सादर करण्याचा प्रचंड बोझा शिक्षकांवर टाकण्यात येत आहे.
ही बाब सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यावर तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्‍यक व निकडीचे असल्याचे शिक्षक परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून त्याद्वारेच सर्व ऑनलाईन कामाचे नियोजन व अंमलबजावणी करावी. शिक्षकांवर ऑनलाईन कामे लादून शैक्षणिक वातावरण बिघडविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिक्षकांवरील ऑनलाईन कामाचा प्रचंड मानसिक ताण दूर करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अशीही मागणी करण्यात आलेली आहे.
–—
शिक्षकांवर अशैक्षणिक व ऑनलाईन कामांचा मारा होत आहे. या सततच्या ऑनलाईन कामांमुळे शिक्षक अत्यंत मानसिक तणावाखाली अध्यापनाचे कार्य पार पाडत आहेत. परिणामी शिक्षक संवर्गामध्ये मायग्रेन, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शिक्षणातून सुदृढ, निर्भय व सक्षम नागरिक घडविण्याची प्रक्रिया साशंक बनली आहे. -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles