जातीय द्वेषातून शेजारच्या वकीलाकडून खोटे गुन्हे
डेप्युटी जीएसटी कमिश्नर विवेक घोडके यांचा आरोप
पत्रकार परिषदेत गंभीर खुलासे; जातीय अत्याचार प्रकरणी रिपाईचा आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “आम्ही मागासवर्गीय ‘महार’ समाजातील असल्यामुळेच आमच्यावर जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत,” असा गंभीर आरोप शहरात वास्तव्यास असलेले व मुंबई येथे कार्यरत असलेले डेप्युटी जीएसटी कमिश्नर विवेक प्रभाकर घोडके यांनी पत्रकार परिषदेत केला.
घोडके यांनी सांगितले की, ते पत्नी व दोन मुलीसह कादंबरी नगरी 3, इस्कॉन मंदिराजवळ, गावडे मळा, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर येथे मागील 16 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. काही वर्षांपूर्वी शेजारी राहायला आलेल्या एका वकील कुटुंबाकडून त्यांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महानगरपालिकेची विधिवत परवानगी घेऊन घराचे बांधकाम सुरू केले असताना शेजारी राहत असलेल्या वकीलाने अडथळे निर्माण केले. कामगारांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. “आम्ही बंगला बांधत आहोत, चारचाकी गाडी आहे, त्यामुळे त्यांना आमचा विटाळ होतो,” असे वर्तन त्यांच्या कडून होत असल्याचा आरोप घोडके यांनी केला.
दि. 9 ऑक्टोबर 2024, 12 ऑगस्ट 2025 व 31 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्यावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. 31 ऑक्टोबर 2025 रोजी तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. “त्या दिवशी मी स्वतः घटनास्थळी उपस्थित नव्हतो. तरीदेखील माझे नाव गुन्ह्यात टाकण्यात आले. संबंधित व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसताना खोटा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदर वकील कुटुंबाकडून होणाऱ्या जातीय अपमान व मारहाणीबाबत आम्हीही विविध तारखांना गुन्हे दाखल केले. अट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पोलीस संरक्षणासाठीही वारंवार अर्ज करण्यात आले. महिलांचे फोटो काढणे, घर बळकावण्याचा प्रयत्न, महिलांवर मारहाण अशा तक्रारीही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सदर व्यक्ती वकील असल्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करत त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा तसेच नगर कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांना भेटून माहिती दिली. “फक्त वकील असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळते आहे. आमचे जगणे मुश्कील झाले आहे. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे,” असेही त्यांनी सांगितले.
–—
मागासवर्गीय असल्याने डेप्युटी जीएसटी कमिश्नर विवेक प्रभाकर घोडके यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. समोरचे व्यक्ती वकील असल्याचा गैरफायदा घेत खोटे गुन्हे दाखल करत आहेत. घोडके हे कामानिमित्त मुंबईत असतानाही त्यांच्या नावावर शहरात गुन्हे दाखल केले जात आहेत. जातीय द्वेषातून वकील असलेला व्यक्ती त्यांना घराजवळून हटविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर पुन्हा खोटे गुन्हे दाखल झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला.
जातीय द्वेषातून शेजारच्या वकीलाकडून खोटे गुन्हे ,रिपाईचा आंदोलनाचा इशारा
- Advertisement -


