Ahilyanagar ….जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटीसाठी लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

महसूल विभागातील भ्रष्टाचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यासह दोन खासगी इसमांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) काढून देण्यासाठी या आरोपींनी लाचेची मागणी केली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (वय ५७) हा आश्वी बुद्रुक येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासोबत लाचेची रक्कम स्वीकारण्यात मदत करणारे हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८, रा. गजापूर रोड, ढोलेवाडी) आणि प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६, रा. सांगवी) या दोन खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी प्रतीक कातोरे हा तलाठी बोऱ्हाडे यांचा भाचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे शिक्षण घेत असून त्यांना स्वतःचा कुणबी जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी काढायची होती. तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयात आपली मोठी ओळख असल्याचे सांगून तलाठी बोऱ्हाडे याने तक्रारदाराकडून यापूर्वीच १३ हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या मोठ्या बहिणीच्या दाखल्यासाठी पुन्हा १३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यामध्ये जातीच्या दाखल्यासाठी ६ हजार आणि व्हॅलिडिटीसाठी ७ हजार रुपये असे स्वरूप होते. वारंवार होणाऱ्या या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. यावेळी तलाठी बोऱ्हाडे याने बहिणीच्या दाखल्यासाठी पहिल्या टप्प्यात ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार संगमनेर शहर परिसरात सापळा रचण्यात आला. तलाठी बोऱ्हाडे याच्या सांगण्यावरून हितेश घोडेकर याने तक्रारदाराकडून ६ हजार रुपये स्वीकारले आणि ही रक्कम त्याने तात्काळ प्रतीक कातोरे याच्याकडे सुपूर्द केली. यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही जागीच ताब्यात घेतले. रात्री उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles