अल्पवयीन मुलीवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून नराधमाचे कृत्य
अहिल्यानगर – लग्नाचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी परिसरातील रहिवासी असलेल्या सुरज शरद गायकवाड याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. सप्टेंबर २०२४ पासून ते ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आरोपीने पीडितेला अरणगाव येथील एका हॉटेलमधील खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने या प्रकरणाची तक्रार दिली.
सुरुवातीला हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल करण्यात आला होता, मात्र घटनेचे गांभीर्य आणि घटनास्थळ लक्षात घेता तो आता नगर तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. काल दुपारी या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुलीला त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा महिलेला दम
अहिल्यानगर :शहरातील नालेगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालेगाव परिसरातील दातरंगे मळा येथे राहणाऱ्या एका महिलेची मुलगी संबंधित आरोपींकडून होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त होती. आपल्या मुलीला का त्रास देता, असा जाब विचारण्यासाठी ही महिला मुख्य आरोपीच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी प्रेम गायकवाड, गौरव गायकवाड आणि दाम्या यांनी संताप व्यक्त करत फिर्यादी महिलेला “येथून बाहेर नीघ” असे म्हणून अपमानित केले. तसेच, तुझ्या मुलीला आमच्यासोबत बोलायला सांग, नाहीतर तुम्हा दोघींकडे बघून घेईल, अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहेत. शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.


