आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट करत अजित पवारांच्या निधनानंतर एआय व्हिडिओ बनवणाऱ्या मुलांचे कौतुक केले होते. AI इंजिनिअर तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, असे म्हणत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजात एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा दिलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट चित्रफिती व ध्वनिफिती समाजमाध्यमे तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी वक्तव्ये पसरवत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणे हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नाव न घेता रोहित पवार यांनाच लक्ष्य केलयं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्टपणे इशारा देतो की, संबंधित व्यक्तींनी अशा एआय-निर्मित बनावट चित्रफिती व ध्वनिफितींचे प्रसारण तात्काळ थांबवावे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सायबर कायद्यांनुसार व अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंदवून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. तसेच, जनतेला व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे पाठवू नयेत, प्रसारित करू नयेत आणि त्यावर विश्वास ठेवू नये. सत्यतेची खात्री न करता कोणतीही माहिती शेअर करणे टाळावे, असे इशाराही दिला.


