महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बुधवारी या भेटीचे फोटो सर्वत्र झळकले आणि राजकीय चर्चांना उधाण आले. या सर्व घाडमोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयावर त्यांचे मत मांडले.
पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे दिसले. त्यांना या भेटीवर प्रश्न विचारला असता तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी इतकंच सांगतो की आम्ही त्यांची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं त्यावर आमचं बंधनं नाहीत. एकनाथ शिंदे प्रवृत्तीशी यांच्या विरुद्ध आमच टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी मराठी माणूस महाराष्ट्राशी बेइमानी केली. जे नंदनवन तुम्ही सांगतात ते शिवसेना चोरीतून झालेलं आहे. या भांडणात आमचा जय होईल. या भेटीबाबत मला काही वाटत नाही. मी त्या विषयाकडे पाहत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे. तो त्यांचा निर्णय आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.


