अहिल्यानगर-शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६१ लाख ६१ हजार ७८९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबटकर मळा, गुलमोहर रोड परिसरातील रहिवासी असलेले ७२ वर्षीय सेवानिवृत्त याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित आरोपी केशव परवाल, प्रोफेसर राहुल बाहरी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी व्हॉट्सअॅप समूहाद्वारे लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. ‘प्रोस्पेरिटी ग्रोथ प्रोग्राम’ नावाच्या समूहाद्वारे त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल असे भासवले. भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी विविध खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले.
डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोखंडे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी केशव परवाल, प्रोफेसर राहुल बाहरी यांच्यासह अन्य मोबाईल क्रमांक धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
नगरमध्ये बंद घर फोडून भरदिवसा चोरी; ८ हजारांचा ऐवज लंपास
अहिल्यानगर – शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सैनिकनगर परिसरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह चांदीची नाणी आणि साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कुमार उपेन्द्र सिंह (वय ३०, व्यवसाय-शेती) हे सैनिकनगर येथील सागर अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून ते २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील ४५०० रुपये रोख, ३००० रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची चांदीची नाणी आणि ५०० रुपयांचा स्पिकर असा एकूण ८००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विशाल कुमार सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शाहीद शेख करत आहेत.


