Friday, February 20, 2026

नगर शहर शिवसेनेत पक्षातून घरचा आहेर ; युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाचे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र

तरुणांचे नेतृत्व पुढे यावे – युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून युवा शिवसैनिका ला प्रतिनिधीत्व मिळावे– अभिषेक भोसले

कर्जत-जामखेड-श्रीगोंदा ते नगरपर्यंत पक्षबांधणीचे योगदान

अहिल्यानगर : युवासेनेचे जिल्हाप्रमुख अभिषेक कैलास भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देत अहिल्यानगर महानगरपालिकेत तरुण व युवा शिवसैनिकांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
या पत्रात त्यांनी स्वतःच्या कामाचा आढावा देत शिवसेना पक्षाच्या संघटन बांधणीमध्ये दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली आहे.
अभिषेक भोसले हे अनेक वर्षांपासून युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी सांगितले की, आपल्या नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर विश्वास ठेवून, प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेनेचे संघटन उभे केले. कर्जत-जामखेड-श्रीगोंदा-नगर या विभागात तरुणांचे जाळे निर्माण करून बूथ लेव्हलपासून पंचायत समिती आणि जिल्हा कार्यकारिणीपर्यंत मजबूत बांधणी केली आहे.
भोसले यांनी पत्रात नमूद केले की,
राज्याचे तरुण नेतृत्व डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या धर्तीवर काम केले. कर्जत तालुक्यात ७१ शाखा कार्यरत असून २५ प्रस्तावित आहेत. जामखेडमध्ये २१ शाखा आणि ३० प्रस्तावित आहेत, तर श्रीगोंद्यात ३८ शाखा प्रस्तावित आहेत.
त्यांनी जिल्हा कार्यकारिणी देखील अत्यंत मजबूत आणि सक्रिय केल्याचे पत्रात म्हटले आहे.
अभिषेक भोसले यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीतील परिणामावर भाष्य करत म्हटले की,
“अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गेल्या काळात २५ वर्ष आमदार आणि ४ महापौर शिवसेनेचे होते. मागील वेळी २४ नगरसेवक निवडून आले, मात्र यावेळी फक्त १० निवडून आले. याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक तरुण व युवा मतदाराकडे आणि तरुण नेतृत्वाकडे झालेले दुर्लक्ष.
त्यांनी पुढे नमूद केले की, महायुतीतील आपले सहयोगी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही निवडणूक तरुण नेतृत्वाखाली लढवली आणि जास्तीत जास्त तरुण उमेदवार निवडून आणले.
अभिषेक भोसले यांच्या म्हणण्यानुसार
शिवसेनेच्या १० नगरसेवकांपैकी ५ महिला आणि ४ ज्येष्ठ असून तरुण नगरसेवक केवळ काही आहेत.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी १३ तर भाजपच्या २५ पैकी १२ नगरसेवक हे तरुण आहेत.
त्यामुळे त्यांनी विनंती केली की,
मी केलेल्या संघटन कार्याच्या जोरावर आणि तरुण म्हणून मला अहिल्यानगर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी.
अभिषेक भोसले यांचे हे पत्र सध्या शिवसेना वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्माण झालेल्या तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि पक्षात नवचैतन्य येण्यासाठी या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles