Friday, February 20, 2026

अहिल्यानगरमध्ये तरुणाने घेतला सख्ख्या भावाचा जीव, वडिलांनी देखील केली मदत

अहिल्यानगरमध्ये एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने पोत्यामध्ये भावाचा मृतदेह भरून घाटामध्ये नेऊन फेकला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या तरुणाला वडिलांनी देखील मदत केली. या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्येमागचं धक्कादायक कारण देखील समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण परिसरातील वांबोरी घाटात दोन दिवसांपूर्वी एका पोत्यामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृतदेहाची ओळख पटवली आणि हत्येचा थरारक उलगडा करत दोन्ही आरोपींना अटक केली.

हत्या झालेल्या तरुणाचे नाव किरण शिवाजी कवाने असे होते. सख्ख्या भावानेच त्याची हत्या केली होती. योगेश शिवाजी कवाने असे आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे किरणच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे वडील शिवाजी शंकर कवाने यांनी देखील मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योगेश कवाने आणि शिवाजी कवाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे अहिल्यानगर हादरले आहे.

पोलिसांनी सांगितले की, किरण कवानेला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत वारंवार आई-वडिलांना मारहाण करत होता. कुटुंबीयांनी त्याला समज देण्याचा तसेच व्यसनमुक्ती करण्याचा प्रयत्नही केले होते. मात्र त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. घटनेच्या दिवशीही किरण दारू पिऊन घरात आई-वडिलांना मारहाण करत होता. त्यावेळी त्याचा योगेशसोबत देखील वाद झाला. या वादात रागाच्या भरात योगेशने किरणची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून वांबोरी घाटात फेकून दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles