*क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सर्वोच्चस्थानी राहील या दृष्टीने काम करा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील*
*क्रीडा संकुलाच्या आधुनिक रूपांतरातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार*
नगर : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाडिया पार्क मैदानाचे अत्याधुनिक क्रीडा संकुलामध्ये रूपांतर करण्यात येत असून, या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांच्या अनुभवाचा क्रीडा विकासासाठी उपयोग करून नावीन्यपूर्ण योजना सादर कराव्यात. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सर्वोच्चस्थानी राहील या दृष्टीने काम करण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
वाडिया पार्क येथे १५ कोटी रुपयांच्या विविध क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या कामाचा आज शुभारंभ होत असून हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जिल्ह्याने अनेक गुणवंत खेळाडू दिले असून त्यांनी उपलब्ध साधनांवर उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची जोड देणे ही काळाची गरज होती.
अत्याधुनिक सुविधांमुळे युवा खेळाडूंना दर्जेदार सराव करता येईल आणि मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. क्रीडा संकुलासाठी सुमारे ५० कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्वांत उत्कृष्ट असे क्रीडा संकुल येथे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले , केंद्र व राज्य शासन क्रीडा विकासाला प्राधान्य देत असून केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ९०० कोटी रुपये ‘खेलो इंडिया’ योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन मंडळातून क्रीडा क्षेत्रासाठी ५० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, सीएसआरच्या माध्यमातूनही आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ५१ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. वाडिया पार्कच्या आधुनिकीकरणामुळे शहर व जिल्ह्यातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केडगाव येथे ७ एकर जागेवर सर्व सुविधांनी युक्त भव्य क्रिकेट मैदान उभारण्याचा मानस असून, शासनामार्फत क्रीडा क्षेत्रात केलेली ही गुंतवणूक युवकांच्या भविष्यासाठी मोलाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलातील विविध विकासकामांची माहिती दिली. प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी विविध क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, क्रीडाप्रेमी नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


