जिल्हा बँकेच्या “लोकनेते स्व. शिवाजीराव कर्डिले सभागृह” चे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
“शेतकऱ्यांची बँक” घडविणाऱ्या लोकनेते कर्डिले यांच्या कार्याला मानाचा मुजरा
त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ – अक्षय कर्डिले यांची भावना
अहिल्यानगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौहुराणा बुद्रुक येथील नव्याने बांधलेल्या तालुका विकास कार्यालयाच्या इमारतीत ‘लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले सभागृहाचे’ उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) मोठ्या उत्साहात पार पडले.
ही नूतन इमारत आणि सभागृह स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच साकार झाले आहे.
त्यांनी बँकेच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा या मूल्यांना प्राधान्य दिले.
म्हणूनच आज नगर जिल्हा बँक “शेतकऱ्यांची बँक” म्हणून ओळखली जाते.
या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,
जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर पाटील घुले, व्हॉइस चेअरमन माधव कानवडे,
संचालक अंबादास पिसाळ, गीतांजली शेळके, अक्षय कर्डिले,
माजी आमदार व संचालक भानुदास मुरकुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे,
तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हाभरातील कर्डिले साहेबांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या पुढाकारातून या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले.
त्यांचे प्रत्येक काम शेतकऱ्यांसाठी, महिला बचत गटांसाठी आणि सामान्य माणसासाठीच होते.
जिल्हा बँकेची ओळख ‘शेतकऱ्यांची बँक’ म्हणून निर्माण व्हावी, हा त्यांचा ध्यास होता.
ते पुढे म्हणाले, कर्डिले साहेबांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्यातील अनेक मान्यवरांनी दिलेला धीर हा आमच्यासाठी अनमोल आहे.
कर्डिले साहेबांच्या विचारांचा वारसा आणि कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करू.
कर्डिले साहेबांनी आपल्या कारकिर्दीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना पतपुरवठा करून स्वावलंबी बनवले.
महिला बचत गटांना प्रशिक्षण व निधी देऊन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती दिली.
त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पारदर्शक कारभाराचा आदर्श ठेवला.
या कार्यक्रमादरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
चौहुराणा बुद्रुक येथील ही नवी इमारत ग्रामीण भागातील सहकारी संस्थांसाठी कार्यक्षमतेचे आणि सुबक नियोजनाचे प्रतीक ठरणार आहे.
कार्यक्रमादरम्यान अनेकांनी स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यशैलीचे आणि सहकार्य वृत्तीचे स्मरण केले.
त्यांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त करत सर्व मान्यवरांनी त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली.


