Sunday, February 22, 2026

पाथर्डी तालुक्यातील सुसरे ग्रामसेवक महिनाभर गैरहजर? ग्रामस्थांचा पंचायत समितीत धडक मोर्चा

पाथर्डी: तालुक्यातील सुसरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या महिनाभरापासून गावात अनुपस्थित असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत गटविकास अधिकारी संगीता पालवे यांना निवेदन दिले. ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. तत्काळ चौकशी करून कारवाई करावी व दोन दिवसांत नवीन, नियमित ग्रामसेवक नेमावा, अशी मागणी सुरेश उदागे, संदीप उदागे, सतीश पिसोटे आदींनी दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम अंतर्गत ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे. त्याची मुख्यालयात नियमित उपस्थिती बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सुसरे येथील ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून गावात न आल्याने जन्म-मृत्यू नोंदणी, विविध दाखले, शासकीय योजनांचे अर्ज, रस्ते व पाणीपुरवठा संदर्भातील प्रस्ताव, ग्रामसभेचे आयोजन आदी कामे प्रलंबित राहिली आहेत.

ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, माहितीचा अधिकार कायद्यान्वये 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत माहिती मागवल्यानंतर ग्रामसेवक कार्यालयात येणेच बंद झाले. तसेच, काही ग्रामस्थांना धमकीच्या स्वरूपात वागणूक देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित संभाषणाचे ध्वनिमुद्रण आमच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.सुसरे ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक नेमण्याची मागणी असून, सध्या एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने सेवा विस्कळीत होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज सुरळीत करण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी व संबंधित ग्रामसेवकावर विभागीय चौकशी करून शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles