Saturday, November 1, 2025

हॉस्पिटलच्या मनमानीला चाप लागणार; पेशंट, नातेवाईकांची तक्रार थेट आरोग्य विभागाकडे; मोबाईल ॲप विकसित केलं जाणार

शासकीय यंत्रणेनं योग्य नियंत्रण ठेवल्यास आपोआप हॉस्पिटल्सना चांगलं काम करावे लागेल. यासाठी मोबाईल अॅपची निर्मिती करत आहोत. यामुळे पेशंट किंवा नातेवाईकांकडून ऑनलाईन आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला येईल. हॉस्पिटलची तक्रार देखील ऑनलाइन पद्धतीने नातेवाईकाला देता येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरमध्ये दिली. गेल्या पाच वर्षात 1 हजार 7 तक्रारी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात आल्या होत्या, असे ते म्हणाले. हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता मोबाईल ॲपद्वारे लोकांना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले

प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल आम्ही केले आहेत. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या योजनेतील आर्थिक मदतीमध्ये वाढ केली जाणार असल्याचे ते म्हणाले. या योजनेत एकही रुपया पेशंटकडून घ्यायचा नसताना दुर्दैवाने काही हॉस्पिटल पेशंटकडून पैसे घेत असल्याचं समोर आलं आहे. त्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. अशा तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरमध्ये चार हॉस्पिटलवर अशी कारवाई झाली असून राज्यात देखील ही कारवाई सुरू होईल.

निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. बजेटमध्ये ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर विभागांना व्हायला हवी होती ती झालेली नाही. यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली आहे, आता गाडी रुळावर येईल. लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यात देखील सर्वच निवडणुका एकत्रित लढवणं अपेक्षित आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही एकमेकांच्या समन्वयाने लढलो तर राज्याचे चित्र दिसलं ते जिल्ह्यात देखील दिसेल, असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles