इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र, इतिहासाच्या परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे थेट भोंग्याद्वारे, स्पीकरद्वारे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. बुधवारी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे बारावी परीक्षेदरम्यान भोंग्यावरून उत्तर सांगितल्याचा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली.
स्व. संगीतादेवी उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा येथील परीक्षा क्रमांक २०७ वर हा प्रकार घडला. या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर शिक्षण मंडळाने प्रकरणात संस्थेकडून लेखी खुलासा मागितला आहे. संस्थेला नोटीस दिल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुपमा भंडारी यांनी दिली आहे.
या परीक्षा केंद्राच्या भिंतीलगत प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे. या इमारतीरून अज्ञात व्यक्तीने भोग्यातून विद्यार्थ्यांना उत्तरं सांगितली. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं यावेळी सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र संचालक सुखदेव थोरात यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लागलीच सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
इयत्ता बारावीसाठी हा सामूहिक कॉपीचा,मास कॉपीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने जी उत्तर सांगितली, ती प्रश्नपत्रिका पाहूनच सांगितली. ही प्रश्नपत्रिका त्या व्यक्तीला पुरवली कोणी, याबाबत मात्र अनेकांनी मौन बाळगले आहे..


