अहिल्यानगर:भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपने पूर्वतयारी सुरू केली असून त्यासाठी पक्षाचे संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी शहराजवळील बुऱ्हाणनगर येथे बैठक घेत भाजपचा उमेदवार विजयी करणे हीच दिवंगत आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्व. कर्डिले यांचे चिरंजीव तथा जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
स्व. कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर गावातच ही बैठक घेण्यात आली. त्यासाठी राहुरी मतदारसंघातील राहुरी, अहिल्यानगर व पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, भाऊसाहेब बोठे, काशिनाथ लवांडे, बाजीराव गवारे, बाळासाहेब अकोलकर, संभाजी पालवे, संदीप कर्डिले, अर्जुन पानसंबळ, अण्णासाहेब बाचकर, रंगनाथ गवते, विक्रम भुजाडे, धनंजय आढाव, युवराज गाडे, बाळासाहेब महाडिक, प्रसाद ढोकरीकर, शाम पिंपळे, दादा बोठे, मीरा बांगर, समीर पठाण आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी सांगितले की, राहुरी पोटनिवडणूक ही केवळ राजकीय नव्हे तर श्रद्धेची व वारशाचीही लढाई आहे. स्व. कर्डिले यांचे कार्य, त्यांचा जनसंपर्क व जनतेतील नाळ आजही जिवंत आहे. त्यांना खरी श्रद्धांजली म्हणजे भाजपचा उमेदवार एक लाख मतांच्या फरकाने विजय करावा.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण थोडे मागे राहिलो. आपण आता ती चूक पुन्हा होऊ देऊ नका. प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधावा. मतदार यादीचा सखोल अभ्यास करावा. स्व. कर्डिले यांचे वारसदार अक्षय कर्डिले अभ्यासू, कर्तृत्ववान व जनतेत स्वीकारार्ह आहेत, असेही अनासपुरे म्हणाले.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले, वडील नसताना माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होईल असा मी विचार कधी केलाच नव्हता. पण कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम व विश्वास मला बळ देत आहे व कर्डिले यांनी कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये, कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एकजुटीने काम करावे अशी शिकवण दिली. हीच खरी आपली ताकत आहे. ही निवडणूक आपण संघटितपणे लढवायची आहे. विजय निश्चित आहे. स्व. कर्डिले यांच्या ३० वर्षाच्या कार्याची पावती यांनी निकालातून मिळेल.


