कोपरगाव तालुक्यातील संवत्सरजवळील रामवाडी येथे एका ३३ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 1 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामवाडी येथील नवनाथ माधव कानफाटे (वय ३३) यांचा रामवाडी येथील हनुमान मंदिरासमोर रात्री अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केला. घटनास्थळी दगड आणि विटा मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या आहे. घटनेची माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती ,कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे या अधिकाऱ्यांसोबत आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य कारणांबाबत पोलीस तपास करत आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सुरू होते. पोलीस उपाधीक्षक अमोल भारती,पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात हजर होते. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांकडून सुरू आहे.


