कर्जत तालुका दुधसंघास शीतकरण केंद्र जागेसह कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मान्यता
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
दुध उत्पादक शेतकरी बांधवांकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई- खाजगी दुध उत्पादकांच्या तीव्र स्पर्धेत सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दुध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर हा तालुका दुधसंघ गरीब, होतकरु शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करीत आहे. दिनांक 11 नोव्हेंबर, 2002 रोजीच्या शासन निर्णयानुसार इतर सहकारी दुध संघाच्या धर्तीवर कर्जत तालुका दुध संघास शीतकरण केंद्र जागेसह बाजारभावाच्या 50 टक्के दराने कायमस्वरुपी मालकी तत्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव आज विधान भवन, मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला. या मंत्रीमंडळ बैठकीत शासन शुध्दीपत्रक दि.27/06/2022 मधील (2) येथे नमूद नियम 7 (ब) मध्ये शिथिलता आणून सहकार महर्षी रावसाहेब तथा बाळासाहेब पाटील सहकारी दुध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्या. कर्जत संघास शासकीय दुध शितकरण केंद्र, कर्जत येथील यंत्रसामुग्री, फर्निचर, वनसंपदा व इतर साहित्य यांची 100% रक्कम व जमिनीच्या सध्याच्या रेडी रेकनरनुसार येणाऱ्या किंमतीच्या 50% रक्कम संघाने भरून कर्जत शितकरण केंद्र कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकाराने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात दुग्धविकास मंत्री मा.श्री.अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.04 नोव्हेबर, 2025 रोजी विधान भवन, मुंबई येथील त्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात दुग्धविकास मंत्री श्री.अतुल सावे यांनी हा विषय मंत्रीमंडळ बैठकीसमोर सादर करुन हस्तांतरण प्रक्रिया मंजूर केली जाईल, असे आश्वासित केले होते. आज दिनांक 05 मार्च, 2026 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीसमोर हा विषय ठेवण्यात येऊन त्यास मंजूरी प्राप्त करण्यात आली आहे.
दुध शीतकरण केंद्र जागेसह कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्याची मागणी सन 2018 मध्ये शासनाकडे करण्यात आली होती. या दुधसंघाची दुध संकलन क्षमता 11 हजार लिटर प्रतिदिन आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकच्या सुविधा देता याव्यात यासाठी ही जागा संघास मालकी हक्काने मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरु होते. विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकाराने या प्रयत्नांना आता यश आले आहे. एकूण मुल्यांकन रुपये 1,27,01,925/- रकमेस कर्जत दुधसंघ कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यासाठी अटी व शर्तीनुसार मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार संघाने आतापर्यंत तीन हप्त्यांमध्ये रुपये 76,21,155/- इतकी रक्कम अदा केली असून उर्वरित रक्कम दोन हप्त्यामध्ये भरणे बाकी आहे.
दुधसंघाचे चेअरमन श्री.मंगेश जगताप, व्हा. चेअरमन श्री.दादासाहेब खराडे, श्री.काकासाहेब धांडे, श्री. रामजी पाटील, सरपंच श्री.विजय पोटरे, श्री.अनिल गदादे, दुधसंघाचे सचिव श्री.शेख यांनी तसेच कर्जत-जामखेड तालुक्यातील दुध उत्पादक संघांच्या प्रतिनिधिंनी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील या निर्णयाचे स्वागत केले असून विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, उप मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे, उप मुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्राताई पवार, दुग्धविकास मंत्री मा.श्री.अतुल सावे यांच्यासह महायुती सरकारला धन्यवाद दिले आहे.


