कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा
अहिल्यानगर, : शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या ठिकाणांच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने ५ मार्च २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार कर्जत तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, शेगुड, श्री लालगिर बुवा मठ ट्रस्ट, मांदळी, तसेच श्री क्षेत्र जगदंबा मंदिर देवस्थान, कुलधरण आणि जामखेड तालुक्यातील श्री जवळेश्वर देवस्थान, जवळा या यात्रास्थळांना ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत ‘ब’वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे.
या दर्जामुळे संबंधित यात्रास्थळांच्या परिसरात मूलभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुशोभीकरण यासह इतर विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावर महत्त्वाचा निर्णय झाला असून स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


