Tuesday, March 10, 2026

अहिल्यानगर शहरात नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात… गुन्हा दाखल

​अहिल्यानगर: शहरातील बोल्हेगाव उपनगरात रात्रीच्या वेळी नियमांची पायमल्ली करून ध्वनिक्षेपकाचा दणदणाट करणे नवरदेवासह चालकाच्या अंगलट आले आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश झुगारून विवाहाची वरात काढल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात नवरदेवासह ध्वनीचेपक यंत्रणेच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​यासंदर्भात पोलिस नाईक रवींद्र तुकाराम धुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल, शनिवारी रात्री बोल्हेगाव उपनगरातील आंबेडकर चौकात‌ एका विवाह समारंभातील नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. मिरवणुकीत मर्यादेबाहेर ध्वनिक्षेपकाचा आवाज सुरू असल्याने ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले गेले. गस्त घालणाऱ्या तोफखाना पोलिसांच्या पथकाने ध्वनिक्षेपक बंद करण्याच्या सूचना वरातीतमधील प्रमुख लोकांसह धनिक्षेपक यंत्रणेच्या चालकास दिल्या. मात्र, नवरदेव आणि ध्वनिक्षेपक चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
​काही वेळातच पोलिसांनी ध्वनीतीव्रता मोजमाप यंत्राद्वारे तपासणी केली असता आवाजाची पातळी ८२.४ डेसिबल इतकी आढळून आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात प्रथमच अशा स्वरूपाची कारवाई झाल्याने, या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून पोलिस प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे संकेत दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी शहर व उपनगरातील ३७ प्रमुख मंगल कार्यालयांचे चालक व ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या मालकांना नियमांचे पालन करण्याचे व प्रदूषण अधिनियमांची उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटिसा बजावल्या होत्या. आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
याशिवाय विवाह समारंभाच्या शहरातून निघणाऱ्या वरातीही वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या संदर्भातही पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. शहराचा मध्यवर्ती भाग गल्लीबोळांचा आहे. अशा रस्त्यावरून निघालेली मिरवणूक वाहतुकीला अडथळा ठरते आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडते. मिरवणुकीमध्ये, रस्त्यावर ध्वनिक्षेपक यंत्रणेकडून नियमांचे उल्लंघन होते. कर्णकर्कश्य आवाजात दणदाणाट केला जातो. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने पोलिसांनी अधिक कठोरपणे कारवाई करावी अशी मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी भरचौकात धनिक्षेपक लावून वाढदिवसाच्या केक तलवारीने कापण्याचे प्रकारही वाढत आहेत. यावरही कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles