Friday, March 13, 2026

नगर अर्बन बँक घोटाळ्यातील फिर्यादीला ‘हनी ट्रॅप’ची धमकी

नगर अर्बन बँक घोटाळ्यातील फिर्यादीला ‘हनी ट्रॅप’ची धमकी, चंद्रकांत उर्फ बाळू भंडारीवर अदखलपात्र गुन्हा दाखल
नगर अर्बन बँकेतील २९१ कोटींच्या बहुचर्चित घोटाळ्यातील मुख्य फिर्यादी राजेंद्र गांधी यांना ‘हनी ट्रॅप’ आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याप्रकरणी, कोतवाली पोलीस ठाण्यात चंद्रकांत उर्फ बाळू रतनचंद भंडारी याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा बीएनएस कलम ३५१ ( अंतर्गत १) दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले.
राजेंद्र गांधी यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ते न्यायालय आणि प्रशासकीय पातळीवर तीव्र पाठपुरावा करत आहेत. या गुन्ह्यात १०५ आरोपी असून, त्यातील आरोपींचे नातेवाईक आणि समर्थक गांधी यांचा राग मनात धरून आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला आणि खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ‘जैन धर्मशाळा’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर चंद्रकांत भंडारी याने गांधी यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्या होत्या. “मला गुंतवण्याच्या नादात एखादा ‘हनी बाँब’ फुटू शकतो बरका,” अशी थेट धमकी भंडारीने सोशल मीडियावरून दिल्याचे गांधी यांनी पुराव्यासह तक्रारीत नमूद केले. अर्बन बँक प्रकरणातील पाठपुरावा थांबवण्यासाठी किंवा मानसिक संतुलन ढळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप गांधी यांनी केला.
राजेंद्र गांधी यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील संभाषणाचे स्क्रीनशॉटही पुरावा म्हणून सादर केले. घार्गे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोतवाली पोलिसांना तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार, बाळू भंडारी याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, या प्रकरणातील इतर संशयितांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles