Saturday, March 14, 2026

राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा भाजप युवा नेते अक्षय कर्डीले यांचे मोठे विधान, म्हणाले

मजले चिंचोली येथे ‘विजयाचा संकल्प मेळावा’ उत्साहात संपन्न

भाजप युवा नेते अक्षय कर्डिले यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

पद हे दाखवायचे नसून ती जबाबदारी – अक्षय कर्डिले

अहिल्यानगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता असताना मजले चिंचोली येथे ग्रामस्थांच्या वतीने ‘विजयाचा संकल्प मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. पांगरमल, घोसपुरी, आव्हाडवाडी, साकेवाडी, उदरमल या परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन वैभव ढाकणे यांनी केले होते. यावेळी भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रा. माणिकराव विधाते, संदीप कर्डिले, नगरसेवक सुरेश बनसोडे, जेऊरचे सरपंच आदिनाथ बनकर, बंडू पवार, मजले चिंचोलीचे सरपंच अमित आव्हाड, धर्मनाथ आव्हाड, बी. वाय. आव्हाड, हरिदास कदम, भाऊराव ढाकणे, खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर, बाबा शेख, भीमानाना आव्हाड, पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड, बाप्पू आव्हाड, भीमराज आव्हाड, आव्हाडवाडीचे सरपंच तुकाराम आव्हाड, डोंगरवाडीचे सरपंच उद्धव गिते, रामकिसन आव्हाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी गेली जवळपास ३० वर्षे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ते मतदारसंघातील गावागावात फिरत असत. शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात ‘कामाचा माणूस’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. आजही मतदारसंघात फिरताना जनता त्यांच्या आठवणींना उजाळा देते आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करते.
त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. पद हे दाखवायचे नसून ती एक मोठी जबाबदारी असते, या भावनेतून नागरिकांची सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील. स्वर्गीय कर्डिले यांनी कुटुंबापेक्षा जनतेत राहणे पसंत केले. जनतेचे प्रश्न सोडविणे हीच त्यांची खरी आवड होती. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मी काम करणार आहे. कर्डिले कुटुंबाचे जनतेशी स्नेहबंध जुळले असून आगामी विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची आहे. मतदारसंघातील दूध व्यवसायिक, शेतकरी, अंगणवाडी सेविका, बचत गट यांसारख्या घटकांच्या प्रश्नांना स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी नेहमीच प्राधान्य दिले होते. त्याच धर्तीवर विकासाची कामे पुढे नेण्याचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक वैभव ढाकणे म्हणाले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी खऱ्या अर्थाने जिरायत भागाच्या विकासासाठी मोठे काम केले. वांबोरी चारीच्या पाण्याचा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आधार देणारे ते लोकनेते होते. जनता दरबाराच्या माध्यमातून घरगुती प्रश्नांपासून ते विकासाच्या मोठ्या प्रश्नांपर्यंत अनेक समस्या त्यांनी सोडवल्या. सर्वसामान्य व्यक्तीचे प्रश्नही ते आपुलकीने सोडवत असत. त्यांनी केलेल्या कामाचे ऋण फेडण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवण्याचा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संदीप कर्डिले म्हणाले की, वैभव ढाकणे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विजय संकल्पनेची सुरुवात केली आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, वीज या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत सातत्याने विकासाची कामे केली. त्यांच्या निधनानंतर जेवढे दुःख आमच्या कुटुंबाला झाले तेवढेच दुःख जनतेलाही झाले. आमच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम जनतेने केले. अक्षय कर्डिले यांना आमदार करून स्वर्गीय कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. माणिकराव विधाते यांचेही भाषण झाले. विविध गावांतील सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त करत अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा संकल्प केला आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी निवडणुकीसाठी एकजूट दाखवली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles