अहिल्यानगर – बारामती आणिअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्हीही दिलं आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात पुढील महिन्यातच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील मतदारसंघात निवडणुकांच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील निवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे, आता या जागेवर पोटनिवडणूक होणार असून निवडणुकीत भाजप राहुरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीची लवकरच घोषणा होऊ शकते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच दोन्ही जागांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे.
बारामती अन् राहुरीत उमेदवार कोण?
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होईल. बारामती मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झालं असून सध्या त्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तर, राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली होती. त्यामुळे, येथील उमेदवार कोण, याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.


